पुणे : पुण्यातील बुधवार पेठ तसेच आसपासच्या व्यापारी भागात अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्याने बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली असून, याच काळात होणारी संभाव्य अन्नभेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.यावेळी तब्बल 4ट्रक संशयास्पद खवा आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कर्नाटक, गुजरात आणि परराज्यातून निकृष्ट दर्जाचा साठा शहरात आणल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मोठ्या फौंजफाट्यासह धाड टाकत छापा टाकण्यात आला.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी अधिकाऱ्यांनी विविध दुकानांमध्ये अचानक छापे टाकले. या धाडसत्रादरम्यान संशयास्पद वाटणारा पनीर आणि खव्याचा साठा तात्काळ ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेल्या सर्व मालाचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सर्वसामान्यांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या तपासणी मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे.

सणांच्या काळात ग्राहकांनी खबरदारी बाळगावी आणि भेसळीचा संशय आल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.








