मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत प्रसारित केलेल्या ध्वनिफितीची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या ध्वनिफितीची न्यायवैज्ञानिक तपासणी करण्यासह प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची जबाबदारी पथकावर सोपवण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, मनोज जरांगे पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत एक ध्वनिफीत प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या ध्वनिफितीत विविध व्यक्तींची नावे आणि विशिष्ट रकमेच्या देवाणघेवाणीचा उल्लेख असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या ध्वनिफितीतील माहितीची सत्यता तपासण्यासाठी तसेच संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विशेष तपास पथकाच्या अध्यक्षपदी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि मुंबई गुन्हे शाखेतील सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांचा पथकात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

विशेष तपास पथकाच्या प्रमुखांना चौकशीसाठी आवश्यक असलेल्या इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच प्रकरणाचा सखोल तपास करून चौकशीच्या प्रगतीबाबत वरिष्ठांना वेळोवेळी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ध्वनिफितीची न्यायवैज्ञानिक आणि तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच त्यातील आवाज, संभाषण आणि उल्लेखांची सत्यता स्पष्ट होऊ शकणार आहे. या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.







