पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. शहरातील फटाक्यांच्या आवाजाची डेसिबल पातळी मोजून त्याची स्वतंत्र तसेच एकत्रित नोंद ठेवण्याचे निर्देश सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, नागरिकांना तक्रारीसाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना नॉइज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी आणि परवानाधारकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजली जाणार आहे. यामुळे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाज करणारे फटाके फोडण्यास बंदी आहे. तसेच फटाक्यांच्या आवाजासाठी स्वतंत्र मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. चार मीटर अंतरावर मोजलेल्या स्वतंत्र फटाक्याच्या आवाजाची कमाल मर्यादा १२५ डेसिबल आहे. ५० आणि १०० फटाक्यांच्या माळांसाठी अनुक्रमे ११५ आणि ११० डेसिबल, तर १०० पेक्षा अधिक फटाक्यांच्या माळांसाठी १०५ डेसिबलची मर्यादा नमूद करण्यात आली आहे.

या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर आढळल्यास संबंधित नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे.

दिवाळीनिमित्त तात्पुरत्या फटाके विक्री परवान्यांचा कालावधी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाके किंवा शोभेची दारू विकता येणार नाही. विक्री न झालेला साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत करणे बंधनकारक असेल.
फटाक्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित फटाके आणि इतर साहित्य जप्त करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण किंवा नियमभंग आढळल्यास ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.






