लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीच्या माजी सरचिटणीस व महिला उपाध्यक्षा स्मिता विजय नॉर्टन (वय 52, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांचे शुक्रवारी (ता. 11) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

स्मिता नॉर्टन या लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही कार्यरत होत्या. या माध्यमातून त्यांनी परिसरातील शेकडो महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. त्यामुळे कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर परिसरात त्या ‘नॉर्टन ताई’ म्हणून आपुलकीने परिचित होत्या.
गोरगरीब, वंचित आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या कायम आवाज उठवत. विविध सामाजिक चळवळी तसेच आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विशेषतः महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारी लढवय्या सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनामुळे परिसरातील सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक संवेदनशील, धडाडीची आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारी कार्यकर्ती हरपल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्मिता नॉर्टन मागील चार दिवसांपासून त्याची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदारम्यान शुक्रवारी (ता. 11) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे. स्मिता नॉर्टन यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथील इंडियन ख्रिश्चन सिमेट्री येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







