पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. नागपूरच्या धर्तीवर पुण्यातही डीजेवर बंदी असावी, असा विचार त्यांनी मांडला. या भूमिकेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू सेवा संघाने आक्रमक भूमिका घेत बापट यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष रोहित मारणे यांच्या मते, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सण-उत्सवांवर सातत्याने आक्षेपार्ह भाष्य करून भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे समाजात दोन गट पडले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे बापट यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भाविकांच्या श्रद्धांचा अपमान केल्याप्रकरणी पुढील 48 तासांत गणेशमंडळे, वारकरी संप्रदाय आणि गणेशभक्तांची बिनशर्त माफी मागावी.

पुण्यातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी 11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या काळात बापट यांना पुणे शहरात प्रवेश बंदी घालावी किंवा हद्दपार करावे, अशी मागणी हिंदू सेवा संघाने केली आहे.ऐन उत्सवाच्या काळात निर्माण झालेल्या या वादामुळे शहरातील वातावरण तापले असून प्रशासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान बापट यांच्या या मागणीला काहींनी पाठिंबा दिला असला, तर दुसरीकडे नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा रोषही पाहायला मिळाला. या वादातून मीडियासमोर त्यांना मारहाणीचा सामनाही करावा लागला; तरीही ते आपल्या मतावर ठाम आहेत.







