पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे यांची खरी संपत्ती समोर आल्यास मराठा समाज त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देत बारस्करांनी जरांगे यांच्यावर सुमारे 1000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे .

बारस्कर यांच्या दाव्यानुसार, आंदोलनाच्या आडून जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी मोठ्या प्रमाणात अथांग संपत्ती जमवली आहे. पूर्वी अवघी 10 गुंठे जमीन असलेल्या पांडुरंग तारक यांच्याकडे आता 50 एकर जमीन आहे. तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात त्यांनी कोट्यवधींच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. याशिवाय बद्रीनाथ तारक, स्वप्नील तारक, गंगाधर काळकुटे, किशोर बलांडे, संजय कटारे, विलास खेडकर आणि श्रीराम कुरणकर या सहकाऱ्यांच्या जीवनशैलीत अचानक मोठा बदल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .जरांगे यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला.

उपोषणादरम्यान सलाईन आणि ग्लुकोन-डी घेऊन ते निव्वळ नाटक करतात आणि आंदोलनाला एका व्यसनासारखे वापरतात, असा टोला त्यांनी लगावला. 2 सप्टेंबर रोजी अंतरवली येथे हैदराबाद गॅझेट आणि ‘सगेसोयरे’च्या जीआरवरून त्यांनी मराठा समाजाची, विशेषतः महिलांची दिशाभूल केली. आंदोलनात तब्बल 350 हून अधिक तरुणांचा बळी गेलेला असताना जरांगे 2 कोटी रुपयांच्या आलिशान डिफेंडर गाडीतून फिरतात, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पारदर्शकतेचा दावा करणारे जरांगे आता बंद खोलीत राजकीय नेत्यांशी चर्चा करत असल्याचा आरोपही करण्यात आला. अशोक चव्हाण, उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी नेमक्या काय बैठका झाल्या, याचा खुलासा करण्याचे आव्हान बारस्करांनी दिले आहे.
जरांगे यांची तुलना ‘कॅप्टन अशोक खरात’ यांच्याशी करत, जरांगे हे सामाजिक क्षेत्रातील खरात बाबा आहेत आणि लवकरच त्यांचा खरा चेहरा उघड होईल, असा दावा त्यांनी केला. सध्याच्या आंदोलनात कोणताही खरा गरजवंत मराठा नसून केवळ व्यावसायिक व वाळूमाफियांचा भरणा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे आता वातावरण चांगलेच तापणार आहे .






