वाघोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 29, रा. दुबेनगर, वाघोली), महेश देवराम लोंढे (वय 26, रा. दुबेनगर, वाघोली) आणि रिना पवण राजपूत (वय -35, रा. बोरकरवस्ती, भावडी रोड, वाघोली) असे तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-7, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) अन्वये दत्ता गायकवाड याला एक वर्षासाठी, तर महेश लोंढे आणि रिना राजपूत यांना प्रत्येकी सहा महिन्यांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

दत्ता गायकवाड याच्याविरोधात मालमत्तेविषयक तसेच शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. महेश लोंढे याच्यावर मालमत्तेविषयक गुन्ह्यांसह बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत. रिना राजपूत हिच्याविरोधातही वारंवार बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केल्याचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आरोपींमुळे वाघोली आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक दबावाखाली वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित आरोपींचे गुन्हे अभिलेख तपासून त्यांच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त अबिनाश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सव 2026 शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी वाघोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष भर दिला आहे. मागील दोन महिन्यांत एकूण सात सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळातही अवैध धंदे करणारे तसेच संघटित पद्धतीने गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अवैध धंदे किंवा संघटित गुन्हेगारीला थारा दिला जाणार नसून, अशा प्रवृत्तींविरोधात तडीपारीसह कठोर प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाघोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, राकेश गायकवाड यांनी केली आहे.







