पुणे : पुण्यात वीस वर्षांपूर्वी गंभीर गुन्हा करून पसार झालेल्या एका आरोपीला येरवडा पोलिसांच्या पथकाने बीडमधून अटक केली आहे. नझीर मुस्तफा खान (वय 46) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, तो गेल्या दोन दशकांत सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.

वर्ष 2006 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, तिला पळवून नेणे आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नझीर खान विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासूनच तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो सतत आपले बस्तान आणि संपर्क क्रमांक बदलत राहायचा. न्यायालयाकडूनही त्याला फरार घोषित करण्यात आले होते. पोलीस त्याचा शोध घेत असतानाही तो पोलिसांना सतत चकवा देत राहिला.
पोलिसांपासून वाचण्यासाठी नझीरने बीड जिल्ह्यातील परळी येथे आश्रय घेतला होता. तिथे त्याने आपली खरी ओळख पूर्णपणे लपवली होती. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी तो गवंडीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. जुन्या आणि प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करताना येरवडा पोलिसांचे पथक या फरारी आरोपीच्या मागे लागले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि साईनाथ मसके यांना गुप्त खबऱ्यामार्फत आरोपी परळीत असल्याची अचूक माहिती मिळाली. ही खात्रीशीर माहिती हाती लागताच पोलिसांनी कोणतीही संधी न सोडता परळीत सापळा रचला आणि नझीर खान याला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडली असून, वीस वर्षांनंतर अखेर हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.






