नाशिक : शहरातून एक अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणानं मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पवन राजेंद्र पाटील असं या मृत होतकरू तरुणाचं नाव असून, तो नाशिकमधील नेक्सनो कंपनीत नोकरीला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्यावर पवनची एका तरुणीशी ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर ती तरुणी पवनपासून हळूहळू लांब राहू लागली. या दुराव्यामुळे पवन तीव्र नैराश्यात गेला होता. दरम्यान, या प्रकरणात जयदीप पाटील, हेमंत जाधव आणि इतर दोन जणांचा त्रास वाढल्याचे समोर आले. पवनने त्या तरुणीला अनेकदा पैसे दिले होते, तरीही तिने त्याला फोन-पे वरून ब्लॉक केले. तसेच जयदीप पाटील आणि त्याच्या मित्रांनी पवनला दोन-तीन वेळा बेदम मारहाण केली होती आणि ओळखीच्या लोकांकडून त्याला सतत धमक्याही दिल्या जात होत्या.
सुट्टीच्या निमित्ताने पवन गावी गेला असताना, त्याच्या वागण्यातील बदल पाहून कुटुंबीयांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा पवनने आपल्यावर होत असलेला हा सर्व अन्याय आणि अपमानास्पद प्रकार घरच्यांना सांगितला. सततच्या या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून त्याने नाशिकमधील दातीर नगर येथील घरी टोकाचे पाऊल उचलले.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना पवनने मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्याने जयदीप पाटील, हेमंत जाधव आणि दोन तरुणींची नावे लिहून त्यांच्याच त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शोककतर कुटूंबिय व नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







