पुणे : विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होत असून यात मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत दारुण पराभव झाला, तर भाजप पुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) उमेदवार दत्तात्रय सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

पराभवानंतर मतमोजणी केंद्राबाहेर बोलताना दत्तात्रय सावंत यांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर सवाल उपस्थित केले. लोकशाहीचा आणि जनादेशाचा स्वीकार करत त्यांनी आपला पराभव मान्य केला. परंतु, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर आणि राजकीय दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, राजकीय पक्षांनी ही निवडणूक पूर्णपणे हायजॅक केली असून, सुमारे 58 तालुक्यांमध्ये परजिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना उतरवून शिक्षकांवर 15 दिवस सतत दबाव निर्माण केला गेला.
सावंत यांच्या दाव्यानुसार, उमेदवारांकडून शिक्षकांना 5000 ते 7000 रुपयांपर्यंतचे आमिष दाखवून मते खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. शिक्षकांनी स्वतःहून पैसे मागितले नसले, तरी त्यांच्या घरापर्यंत जाऊन पैसे टाकून जबरदस्तीने प्रभाव टाकण्यात आला. तसेच, शिक्षक हे थेट सरकारी कर्मचारी नसून खासगी संस्थांचे सेवक असल्याने, राजकीय पक्षांनी थेट शिक्षण संस्थांवरच दबाव आणला. त्यामुळे संस्थाचालक हतबल झाले आणि शिक्षकांना नाईलाजाने या दबावाला बळी पडावे लागले.

शिक्षकांसारख्या बुद्धिवादी घटकाच्या निवडणुकीत पूर्वी कधीही असा वाममार्ग वापरला गेला नव्हता, असे सांगत सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. पराभव झाला असला, तरी खचून न जाता शिक्षक संघटना आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपले काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.







