वेल्हे : कोंढावळे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात संकरित गायीचे वासरू ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. 21ऑक्टोबर) घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील शेतकरी सुनील भागुजी भुरुक यांचे संकरित गायीचे वासरू चरण्यासाठी रानात गेले होते. मात्र, ते सायंकाळी घरी परतले नाही. त्यामुळे शोध घेतला असता वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याचे निदर्शनास आले. यानंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी राजगड वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे आणि विलास गाडे उपस्थित होते.
दरम्यान, ज्या ठिकाणी भक्ष्य सहज उपलब्ध होते, त्या परिसरात बिबट्या वारंवार येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित आणि बंदिस्त ठिकाणी ठेवावीत, रात्री उघड्यावर झोपणे टाळावे तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये. बिबट्या दिसल्यास सुरक्षित अंतर राखून समूहाने राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस पाटील रेणुका शंकर खोपडे यांनी केले आहे







