पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका या पट्ट्यात रस्ता आहे की खड्ड्यांचे भगदाड, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिकांनी केला आहे. ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, उखडलेले डांबर, पडलेल्या चाऱ्या, रस्त्यावर आलेली अतिक्रमणे आणि त्यात भर पडलेली वाहतूक कोंडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून वाहन चालविण्याचा अनुभव ठरत आहे. दुचाकीस्वार कोसळत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे, रुग्णवाहिका तासन्तास कोंडीत अडकत आहेत; मात्र संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना अद्याप जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

“रस्ता दुरुस्त करू नका, खड्डे बुजवू नका, अतिक्रमणे हटवू नका; जनता मेली तरी काही सोयरसुतक बाळगू नका. घरी बसून वेतन-भत्ते मात्र बिनधास्त घ्या. पण उद्या हीच वेळ तुमच्यावर आली तर ओरडू नका, बोंबलू नका,” अशा शब्दांत वाहनचालकांनी प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला आहे.

आषाढी वारीच्या काळात देहू-आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार असताना मुसळधार पावसाने या मार्गाची अवस्था आणखी बिकट केली. पावसामुळे डांबरी रस्ता अक्षरशः वाहून गेला. त्या वेळी एमएसआयडीसीचे अभियंता संजीव पाटील यांनी पालखी पंढरपूरकडे जाण्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करून तो वाहतुकीसाठी योग्य केला जाईल, असे सांगितले होते. मात्र पालखी पंढरपूरची वारी करून पुन्हा देहू-आळंदीत विसावली, तरी रस्ता मात्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच आहे. “पालखी परतली; पण अधिकाऱ्यांचे आश्वासन अजून रस्त्यावर आलेले नाही,” अशी बोचरी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

मागील महिन्यात अभियंता संजीव पाटील यांच्याशी संवाद साधला असता, “वरिष्ठांशी चर्चा करतो,” असे उत्तर मिळाले होते. आता महिनाभरानंतर ही चर्चा नेमकी कोणाशी सुरू आहे आणि तिचा निकाल कधी लागणार, हा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. रस्त्यावरून दररोज हजारो वाहने धावत असताना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असताना निर्णयासाठी केवळ चर्चा, बैठक आणि आश्वासनांचा आधार घेतला जात असेल, तर प्रत्यक्ष काम कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका या पट्ट्यातील परिस्थिती विशेष गंभीर आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबर उखडून खडी आणि माती बाहेर आली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला चाऱ्या पडल्या आहेत. वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढते. दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे या मार्गावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. रुग्णालयात पोहोचण्याची प्रत्येक मिनिट महत्त्वाची असताना रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये अस्वस्थता आणि संताप आहे. “रुग्ण आत तडफडत असताना रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही; वाहनचालक कोंडी फोडण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात; तरीही अधिकाऱ्यांच्या अंगाला घाम फुटत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक विभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करूनही भाजी व फळविक्रेते रस्त्याच्या मोठ्या भागात उभे राहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे उपलब्ध रस्ता आणखी अरुंद होऊन वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे. “प्रशासनाला अतिक्रमण दिसत नाही की कारवाई करण्याची इच्छाच नाही?” असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे मंत्री किंवा व्हीआयपी व्यक्ती या मार्गावरून जाणार असल्याचे समजताच प्रशासनातील विविध विभाग अचानक सक्रिय होतात, असा नागरिकांचा आरोप आहे. अतिक्रमणे हटविली जातात, रस्ता मोकळा केला जातो, खड्डे बुजविले जातात आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा रस्त्यावर उतरते. व्हीआयपींचा दौरा संपला की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. मग रस्ता हा केवळ मंत्र्यांसाठी आहे का, सामान्य नागरिकांसाठी नाही? असा सवाल आता नागरिकांनी थेट प्रशासनाला विचारला आहे.
“मंत्री येणार म्हटले की सर्व विभाग झाडून कामाला लागतात; जनता रोज प्रवास करते तेव्हा मात्र अधिकारी दिसत नाहीत. मग जनतेच्या जीवाची किंमत व्हीआयपींच्या प्रवासापेक्षा कमी आहे का?” असा सवाल गोविंद कुंजीर, मयूर फडतरे, बाळासाहेब विभुते, अशोक मोरे, दिलीप तुपे, अजित विभुते आणि गजानन विभुते यांनी केला.
रस्त्याची दुरुस्ती ही जनतेवर केलेली कृपा नाही; ती संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. अतिक्रमण हटविणे ही प्रसिद्धीची मोहीम नाही; ती कायद्याची अंमलबजावणी आहे. रुग्णवाहिकेला मार्ग उपलब्ध करून देणे ही संवेदनशीलतेची बाब नाही; ती जीवन-मरणाची जबाबदारी आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दगडाला घाम फुटेल; पण अधिकाऱ्यांना नाही, अशी अवस्था झाली आहे. नागरिकांच्या संतापाची ही भाषा केवळ रस्त्याच्या खड्ड्यांविषयी नाही; ती प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभाराविषयी आहे. फाइलवर रस्ता दुरुस्त झाल्याचे दाखविण्यापेक्षा अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थिती पाहणार कधी, हा खरा प्रश्न आहे.
आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे. खड्डे बुजवा, रस्ता दुरुस्त करा, अतिक्रमणे हटवा आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा ठेवा. जनता कर भरते.बदल्यात खड्डे, कोंडी आणि अतिक्रमणे मिळणे हा विकास नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पंचनामा आहे.






