पुणे : व्यवसाय वादातून एकावर गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गोळीबाराचा छडा लावून अवघ्या दोन तासाच्या आता आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
अजय सुनिल फुले (वय-21, रा. महावीर पार्क सोसायटी, गायवासरू चौक, मोहननगर, चिंचवड, पुणे) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हर्षल सोनावणे, शाम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय फुले व आरोपी हर्षल सोनावणे या दोघाचेही जाधववाडी परिसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकान आहेत. त्याच्यात गेल्या सहा महिन्यापासून व्यवसायिक वाद होते. गिऱ्हाईक तोडण्याच्या प्रकारावरुन त्याच्यात वारंवार खटके उडत होते. याच बाबीचा राग मनात धरुन आरोपी हर्षल व त्याच्या दोन साथीदारांनी मारण्याचा कट रचला.
हर्षल सोनावणे याने त्याचे साथीदार शाम चौधरी व किर्तीकुमार यांना अजय फुले यांच्याकडे वाद मिटविण्यासाठी पाठविले. व चर्चा करण्याच्या बहाण्याने अजय फुले यांना जाधवचाडी ते पंतनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या जवळ घेवुन गेले. तेथे चर्चा करत असताना नियोजीत कटानुसार आरोपी हर्षल सोनावणे हा तेथे आला व त्याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले. आणि पिस्टलमधून तीन गोळया फिर्यादी अजय फुले यांच्यावर झाडल्या, त्यापैकी एक गोळी फिर्यादीचे दंडाला तर दुसरी गोळी सहआरोपी किर्तीकुमार लिलारे याच्या मानेला लागली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिकली पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हालवली. तेव्हा गुन्ह्यातील सहआरोपी जखमी असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी पिंपरी येथील रुग्णालयात जाऊन आरोपी किर्तीकुमार लिलारे याची विचारपूस केली. त्यानंतर बाकीच्या दोन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शाम चौधरी याला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्षल सोनावणे हा घटनेनंतर त्याचा मोबाईल बंद करून पळून गेला होता, त्यामुळे त्यास निवडणुक प्रक्रियेच्या अनुषंगाने तात्काळ अटक करण्याचे पोलिसांसमोर खूप मोठे अवाहन होते. चिखली पोलीस तपास पथकाने त्याच्या पळून जाण्याच्या संभाव्य रस्त्यावर लक्ष केंद्रीत केले. तेव्हा आरोपी हर्षल सोनावणे चाकणच्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून आरोपी हर्षल सोनावणे याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
सदरची कामगिरी चिखली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोरे, सहाय्यक फौजदार वडेकर, कडलग, पोलीस हवालदार बाचा गर्ने, संदीप मासाळ, विश्वास नाणेकर, चेतन सावंत, आनंदा नांगरे, भास्कर तारकर, सुनिल शिदे, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड यांच्या पथकाने केली आहे.