अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : ता.१३ पाबळ ता. शिरुर येथील जमदाडे मळा येथे १ मे २०२१ रोजी घरात झोपलेल्या मायलेकींवर सशस्त्र हल्ला करुन मायलेकींना गंभीर जखमी करुन दरोडा टाकल्याची घटना घडलेली असताना यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनतर तब्बल तीन वर्षे फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. सौरभ डायवऱ्या भोसले असे सदर आरोपीचे नाव आहे.
पाबळ ता. शिरूर येथील जमदाडे मळा या ठिकाणी राहणाऱ्या तुळसाबाई जाधव व शकुंतला शिंदे या मायलेकी घरात झोपलेल्या असताना १ मे २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करत काही दागिने चोरून नेले होते. यावेळी चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तुळसाबाई पर्वती जाधव व शकुंतला प्रकाश शिंदे या मायलेकी जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान शकुंतला प्रकाश शिंदे वय ७० वर्षे रा. जमदाडे मळा पाबळ ता. शिरूर जि. पुणे यांचा मृत्यू झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत या गुन्ह्यातील दिनेश कुंडल पवार, भेंड्या उर्फ अविनाश किरण काळे, नाग्या उर्फ नागेश संतोष काळे, संतोष तकत्या काळे यांना अटक केली. मात्र या गुन्ह्यातील सौरभ डायवऱ्या भोसले हा तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असताना सौरभ हा तळेगाव ढमढेरे परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, प्रताप कांबळे यांनी साध्या वेशात जाऊन तळेगाव ढमढेरे परिसरात सापळा लावला आणि तीन वर्षांपासून फरार असलेल्या सौरभ डायवऱ्या भोसले वय २४ वर्षे, रा. वैदवाडी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे याला पकडून अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.