Talegaon Election : पुणे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी भाजपचे उमेदवार संतोष दाभाडे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव करत 9795 मतांनी महापौरपद पटकावले आहे. या निकालामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी युतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. Talegaon Election

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण 14 प्रभाग असून त्यातून 28 नगरसेवक निवडून येतात. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे 10 आणि भाजपचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांसाठी तसेच महापौरपदासाठी मतदान झाले होते. रविवारी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत शांततेत मतमोजणी पार पडली.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे संतोष दाभाडे यांना 20456 मते मिळाली. अपक्ष उमेदवार किशोर भेगडे यांना 8701 मते तर अपक्ष अॅड. रंजना भोसले यांना 1960 मते मिळाली. नोटाला 729 मते पडली. या निकालात दाभाडे यांनी 9795 मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
ज्या आठ ठिकाणी थेट निवडणूक झाली, त्या ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 8 मधील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके यांनी 2501 मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 2774 मते मिळाली, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे भाजपचे माजी नगरसेवक अमोल शेळके यांना केवळ 273 मते मिळाली.
या निकालामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शहर विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






