राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात मोशी येथील समाज प्रबोधनकार प्रा. ह.भ.प. राजेश बोराटे यांना इंद्रायणी भूमिपुत्र म्हणून गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते राजेश बोराटे यांनी सपत्निक हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले.
आपण ज्या भूमीत जन्माला आलो, त्या मातीचे ऋण फेडण्याची भावना मनाशी बाळगून, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला योग्य ती दिशा देण्याचे काम प्रा. बोराटे यांनी केले. ज्ञानदानाच्या पवित्र मंदिरात मातीच्या गोळ्यांना योग्य तो आकार देत, उद्याची उज्ज्वल पिढी घडविण्याचे महान कार्य प्रा. बोराटे करत आहेत. यामुळे नागेश्वरनगर, मोशी येथील समाज प्रबोधनकार प्रा. बोराटे यांना भूमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन पद्मश्री ना. धो. महानोर साहित्यनगरी, मोशी येथे झाले. इंद्रायणीच्या तिर्थावर असणाऱ्या अनेक गावांतील साहित्य प्रेमींना एकत्र करून, सुरू झालेल्या या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या वर्षी समाज प्रबोधनकार प्रा. राजेश महाराज बोराटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. बोराटे हे आपल्या प्रवचन व किर्तनातून गेली अनेक वर्षे समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. श्री नागेश्वर महाराज मंदिर मोशी, येथे श्रावण मासात गेली १० वर्षांपासून ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, व्यासपीठ चालक म्हणून राजेश महाराज बोराटे आपली अध्यात्मिक सेवा जोपासत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.