प्रदिप रासकर
निमगाव भोगी : (ता. शिरुर) गावच्या हद्दीतील बेल्हा-जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे गुरुवारी (दि २९) शिरुर-नारायणगाव एस टी बसच्या चालक व वाहकास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एसटी बस चालक कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर यांनी राहुल सोनवणे (रा. जांबुत) याच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जांबुत गावच्या हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस टी बस थांब्यावर बस थांबवली असता एस टी बस (एम एच १४ बी टी ४२७९) मधुन प्रवासी उतरत असताना राहुल सोनवणे (पुर्ण नाव समजले नाही) याने त्याचा डंपर बसच्या समोर उभा केला. बस चालक गाडीलकर यांनी डंपर चालक राहुल सोनवणे यास डंपर बाजुला घेण्यास सांगितले असता सोनवणे याने गाडीलकर यांना शिवीगाळ करत मारहाण करुन ढकलुन दिले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे गाडीलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
ग्रामीण भागात गोरगरिबांच्या सेवेसाठी अविरत सेवा देणारे एसटी महामंडळाचे चालक, वाहक यांना नित्याने ठरलेल्या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. मात्र अशा मारहाणीच्या घटना घडल्याने त्यांचे मनोबल खचणार असुन दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बस चालकास मारहाण सुरु झाल्यानंतर मी मोबाईल मध्ये या घटनेची शूटिंग सुरू केली. मात्र शूटिंग चालू असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे उपस्थित असलेला स्वामी शिंदे या युवकाने माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राहुल सोनवणे याने मलाही मारहाण केली असे एस टी बसचे वाहक शांताराम मारुती रासकर यांनी सांगितले.
” माझ्या पायाचे ऑपरेशन झाले आहे. पायामध्ये रॉड टाकलेले असलेने मला मारहाण झाली तेव्हा मी जमिनीवर कोसळलो. मारहाण करणारा इसम हा तेथील स्थानिक असलेने उपस्थितांपैकी कुणीही मला मदत केली नाही. बस पोलीस ठाण्यात घेवून यावी लागली. यामुळे दररोज बस ने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय झाली.
कुंडलिक गाडीलकर, एस टी बस चालक