शिरूर: शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व (Shirur News) पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यात एकूण 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गण असून यासाठी 337 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील एकही मतदान केंद्र संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील नसल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)
निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 21 जानेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत) उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून 23,24 व 25 जानेवारी या कालावधीत अर्ज माघारी घेता येतील. 27 जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी 2190 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक असून ते पुरेसे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासोबतच एकूण राखीवसह 35 सेक्टर ऑफिसर निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पडण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मतदान कर्मचाऱ्यांसाठी व सर्व यंत्रणेसाठी 53 ते 55 एस.टी. बसेस उपलब्ध राहणार आहेत.
सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत असून अपंग व वृद्ध मतदारांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांना विविध प्रकारच्या परवानग्यांसाठी शिरूर तहसील कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर मोबाईल वापरास पूर्णतः बंदी असणार असून, यासाठी विशेष तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
खर्च मर्यादेबाबत,जिल्हा परिषद उमेदवारांसाठी 9 लाख रुपये तर पंचायत समिती उमेदवारांसाठी 6 लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान,16 जानेवारीपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. निवडणुकीनंतर मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी येथील राज्य वखार महामंडळ,गोडाऊन क्रमांक 2 येथे पार पडणार आहे.







