न्हावरे: राज्यात गुटखा व तंबाखूजन्य (Shirur News) पदार्थांवर कायद्याने बंदी असतानाही शिरूर तालुक्यात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे धक्कादायक (Pune News) चित्र समोर आले आहे. शिरूर, न्हावरे, शिक्रापूर तसेच मांडवगण फराटा या परिसरांमध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असून यामागे गुटखा माफियांवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे,असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

तालुक्यातील अनेक पानठेले, दुकाने व टपऱ्यांवर बंदी असलेले गुटखा व तंबाखू मिश्रित पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी होऊनही पोलिस व अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस व प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

त्यामुळे गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे. बंदी असलेला गुटखा सापडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात कितपत कठोरपणे अंमलात येणार, हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते (व्हिसल ब्लोअर) निलेश वाळुंज यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, पोलिस विभाग व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहिम राबवून गुटखा विक्रीवर आळा घालावा. तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात गुटखा व अन्य प्रतिबंधित पदार्थ आढळतील, त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करावी. यासोबतच त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
गुटखा माफियांविरोधात कठोर कायदे, आवश्यक असल्यास मोक्का सारखी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत असून आता प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा माफियांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतले असून मोठ्या प्रमाणावर गुटखा माफियांवर कारवाई केली जाईल.”
– बी.एम.ठाकूर(सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे)
“नागरिकांनी संबंधित गुटखा माफियांची नावे पोलिस प्रशासनाला कळवल्यास अशा नागरिकांची नावे गोपनीय ठेवून गुटखा माफियांवर कडक कारवाई केली जाईल”.
– संदेश केंजळे (पोलिस निरीक्षक, शिरूर)







