Palghar News: पालघर : शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन धावून तिसरा क्रमांक मिळवल्यानंतर अवघ्या काही वेळातच 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तलासरी तालुक्यात घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून रोशनी गोस्वामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Heart Attack

हेही वाचा- गुन्हे शाखेच्या युनिट २ कडून सराईत तरुणाला बेड्या; पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त करून मोठा कट उधळला!

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील वेवजी येथे लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धेचाही समावेश होता.
या मॅरेथॉन स्पर्धेत इयत्ता 10 वीमध्ये शिकणारी 15 वर्षीय रोशनी गोस्वामी हिने सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान रोशनीने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. मात्र स्पर्धा पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तिला त्रास जाणवू लागला. मॅरेथॉन संपल्यानंतर तिला तीव्र धाप लागली आणि श्वास घेण्यास अडचण होऊ लागली. त्यानंतर ती मैदानातच खाली बसली आणि काही क्षणांत बेशुद्ध पडली.
ही स्थिती पाहून शाळेतील शिक्षकांनी तातडीने रोशनीला उपचारासाठी गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रोशनी गोस्वामीच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. घोलवड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास पोलीस करत आहेत.







