पुणे: पुण्यातील रावेत परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. एका २९ वर्षीय डॉक्टरने २४ मजली इमारतीवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव डॉ. श्वेता तुळशीराम रोकडे असे असून, त्या रावेत येथील ‘सेल्स्टेयल सोसायटी’मध्ये आपल्या मैत्रिणीसोबत राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास श्वेता आपल्या राहत्या घराच्या जवळच असलेल्या ‘ऑस्ट्रिया रॉयल्स’ या २४ मजली इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या होत्या. तिथे नेमके काय घडले, हे कुणालाही समजण्यापूर्वीच त्यांनी थेट २४ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. इमारतीवरून कोणीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज ऐकताच तिथे काम करणारे मजूर आणि सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि श्वेता यांचा जागीच मृत्यू झाला होता.

श्वेता यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिस याची चौकशी करत आहेत. सध्या रावेत पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






