सासवड, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळ प्रकल्पाची जागा अयोग्य ठरली आहे,” असे दर्शवणारे प्रशासनाचे बनावट लेटरपॅड आणि खोटे पत्र तयार करून ते शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले.

याप्रकरणी संतोष हरी बरगे (वय ३७, व्यवसाय नोकरी, रा. बच्चेपाटील कॉलनी, राजगुरूनगर, जि. पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (ता. 12) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 12) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर आणि मुंजवडी या गावांमधील शेतकऱ्यांच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर एक पत्र वेगाने व्हायरल झाले. या पत्रामध्ये, प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठीची जमीन तांत्रिक तपासणीनंतर अयोग्य ठरली असून प्रकल्प रद्द किंवा इतरत्र हलवला जाणार असल्याचा मजकूर होता.

संबंधित विभागाचे अधिकारी संतोष बरगे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. आरोपीने बरगे यांच्या कार्यालयाचे हुबेहूब बनावट लेटरपॅड तयार केले होते आणि त्यावर खोट्या मजकुराचे पत्र बनवून ते सर्वत्र प्रसारित केले होते. विमानतळाच्या भूसंपादनाबाबत स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीती, संभ्रम आणि प्रशासनाविरुद्ध अविश्वास निर्माण व्हावा, याच कुहेतूने हा कट रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या कार्यालयाचा आणि लेटरपॅडचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, संतोष बरगे यांनी सासवड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (ता. 18) अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३६(२) आणि ३३६(४) (खोटी माहिती व बनावट दस्तऐवज तयार करून संभ्रम निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तांत्रिक तपास करत आहेत.







