नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे वापरावर निर्बंध लादले आहेत. मात्र, या अधिकृत बंदी आदेशांकडे दुर्लक्ष करत नागपुरातील बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात डीजेचा दणदणाट सुरू असल्याचे समोर आले आहे.

सकाळपासून डीजे लावण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आयोजकांनी संध्याकाळी दहीहंडी उत्सव सुरू होताच गाणी सुरू केली. नेहमीच्या तुलनेत आवाजाची पातळी काहीशी कमी असली, तरी तीव्र प्रकाशाच्या झोतात डीजेचा दणदणाट कायम आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची नोंद घेत असून, संध्याकाळी 7 वाजता सुमारे 80 ते 82 डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. या नियमभंगावर पोलीस प्रशासन नेमकी काय दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजे बंदी ही दोन महिन्यांपुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. ही आपली वैयक्तिक भूमिका नसून, वृद्ध नागरिक, रुग्ण, चिमुकले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेली लोकभावना आहे. शहरातील सुमारे 20 ते 25 उत्सव मंडळांनी डीजेचा वापर न करण्याचे हमीपत्रही लिहून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार प्रवीण दटके यांनी पोलीस आयुक्तांचा हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आक्षेप नोंदवला आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्याच काळात अशा प्रकारची डीजे बंदी का लादली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.







