पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात गोपाळकाल्याच्या सणाच्या दिवशीच एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. एका इमारतीत काम करत असताना 30 वर्षीय तरुण कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाला. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भोसरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित महाजन असं मृत कामगारांच नावं आहे. रोहित हा कामानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होता. दहीहंडीच्या दिवशी एका इमारतीमध्ये काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार शॉक लागला. हा झटका इतका तीव्र होता की तो गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रोहितचा मृतदेह इमारतीवरून खाली आणण्यात आला आणि पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हा अपघात नेमका कसा घडला, विजेचा प्रवाह कसा उतरला आणि यात कोणाचा निष्काळजीपणा होता का, या सर्व बाबींचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. आनंदाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या घटनेमुळे रोहितच्या मूळ गावी आणि भोसरी परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.







