छत्रपती संभाजीनगर : देवीच्या दर्शनावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून मदतीसाठी धावलेल्या वडील आणि भावावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय ४३) आणि त्यांचा मुलगा निहाल (वय १७) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णानगर परिसरात राहणारे बाबासाहेब कीर्तिकर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांचा मुलगा साहिल मध्यरात्री परिसरातील सार्वजनिक देवीच्या मंडपात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर घरासमोर थांबल्याच्या कारणावरून राजेंद्र गयचंद आणि त्याचा मुलगा नागेश यांच्याशी त्याचा वाद झाला. या वादातून साहिलला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली.

साहिलचा आवाज ऐकून त्याचे वडील बाबासाहेब, भाऊ निहाल आणि कुणाल घटनास्थळी धावले. त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद अधिकच वाढला. आरोपानुसार, शानो गयचंद हिने घरातून चाकू आणून दिला, तर अन्य संशयितांनी लाकडी दांडे आणि टिकावाचा वापर करून हल्ला केला. यावेळी नागेशने बाबासाहेब आणि निहाल यांच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. या हल्ल्यात साहिल आणि कुणाल हेही जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर संशयित हरियाणाकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून राजेंद्र, मनोज, नागेश, मानसी आणि शानो गयचंद या पाच जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास सुरू आहे.






