पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या प्राथमिक तपासात जवळपास 3,897 ग्राहकांशी संबंधित नोंदी लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 16 ऑक्टोबर रोजी डिफेन्स सायबर एजन्सी आणि CERT-In या सायबर सुरक्षा संस्थांकडून याबद्दल सूचना मिळाल्यानंतर बँकेने तात्काळ तपास सुरू केला.

या लीक झालेल्या माहितीमध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, बँक शाखेचा तपशील, ग्राहक ओळख क्रमांक आणि कर्जाशी संबंधित नोंदींचा समावेश आहे. हॅकिंग समूहाने अधिक ग्राहकांचा डेटा चोरी केल्याचा दावा केला असला, तरी सध्या बँकेला फक्त 3,897 नोंदींचाच सुगावा लागला आहे.

बँकेने स्पष्ट केले आहे की, या सायबर घटनेमुळे मुख्य बँकिंग प्रणाली किंवा ग्राहकांच्या पैशांवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही. आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. डेटा लीक झाला म्हणजे खात्यातील पैसे गेले असे नाही, पण या माहितीचा वापर करून सायबर भामटे फसवणूक करू शकतात.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
खाजगी माहिती गुप्त ठेवा: बँक कधीही दूरध्वनी किंवा संदेशाद्वारे गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे आपला OTP, ATM PIN, UPI PIN अथवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.
संशयास्पद लिंक्स टाळा: अनोळखी ईमेल किंवा मेसेजमध्ये आलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
कॉलपासून सावध राहा: बँकेचे अधिकारी सांगून फोन करणाऱ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका.
व्यवहारांवर लक्ष ठेवा: आपले बँक खाते आणि पासबुक नियमित तपासा. कोणताही संशयास्पद व्यवहार दिसल्यास लगेच बँकेला अथवा 1930 या सायबर हेल्पलाइनवर कळवा.
ग्राहकांनी घाबरून न जाता अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.






