पुणे : मुंबई ते बंगळुरू या पट्ट्यात प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच रुळावर धावणार असून, ही सेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी.सी. मोहन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.मात्र रेल्वे प्रशासनाकडून या तारखेबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, तरीही ऑक्टोबर महिन्यातच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या नवीन ट्रेनमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. सध्या मुंबईहून बंगळुरूला जाण्यासाठी जवळपास 24 तास लागतात. मात्र, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे हा प्रवास 16 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल, ज्यामुळे प्रवाशांचे तब्बल 8 तास वाचणार आहेत. या आधुनिक ट्रेनमध्ये एकूण 16 स्लीपर कोच असून, एका फेरीत 823 प्रवासी प्रवास करू शकतात. ही गाडी आठवड्यातून 6 दिवस दोन्ही दिशांनी नियमित धावणार आहे. मुंबईतून मंगळवार वगळता आणि बंगळुरूहून सोमवार वगळता इतर सर्व दिवशी प्रवाशांना ही सेवा उपलब्ध असेल.

काही दिवसांपूर्वीच या ट्रेनची मुंबई ते लोणावळा या मार्गावर चाचणी घेण्यात आली. रिकाम्या रेकच्या सहाय्याने घेतलेल्या या टेस्ट रनमध्ये गाडीचे तांत्रिक निकष आणि वेग यशस्वीपणे तपासण्यात आले. ही ट्रेन आपल्या प्रवास दरम्यान कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंटकल, अनंतपूर आणि धर्मावरम या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

या सुपरफास्ट स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायक आणि वेगवान होणार असून, दक्षिण आणि पश्चिम भारतामधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.






