पुणे : कॉकरोच जनता पार्टी सध्या देशातील शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी उघड करण्यासाठी मोठी मोहीम राबवत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतःच्या गावापासून या उपक्रमाची सुरुवात केली होती. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते शासकीय शाळांना अचानक भेटी देऊन तिथे असणाऱ्या दुरवस्थेची पाहणी करत आहेत. आता मुंबई पोलिसांनी CJP च्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी CJP कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाळा आणि महाविद्यालये ही केवळ विद्यार्थी व शिक्षकांसाठी असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही संस्थेत किंवा शैक्षणिक परिसरात विनापरवानगी प्रवेश करून आंदोलने किंवा पाहणी करणे गैरकायदेशीर आहे. शाळा प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसेल आणि त्यांनी याविरोधात तक्रार नोंदवली, तर संबंधित कार्यकर्त्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.

एकीकडे CJP च्या मोहिमेमुळे शाळांमधील अडचणी प्रशासनासमोर येत आहेत, तर दुसरीकडे विनापरवानगी प्रवेशामुळे कायदेशीर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पोलिसांच्या या भूमिकेनंतर कॉकरोच जनता पार्टी आपली मोहीम कशी पुढे नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CJP कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी तुटलेल्या वर्गखोल्या आणि अस्वच्छ स्वच्छतागृहांची भीषण वास्तव समोर आले आहे. या मोहिमेमुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून विविध राज्यांत शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर CJP ने हाती घेतलेल्या या उपक्रमाची देशभरात मोठी चर्चा सुरू असतानाच आता पक्षासमोर कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांनी CJP च्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत थेट कारवाईचा इशारा दिला आहे.







