पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत MPSC अध्यक्षांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची हाक दिली असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एका व्हॉट्सअॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट शेअर केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. उच्चपदस्थ अधिकारी परीक्षेच्या तारखांबद्दल उमेदवारांशी संवाद साधत असल्याचे या चॅटवरून स्पष्ट होत असून, हा थेट गोपनीयतेचा भंग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करत, आयोगाचे उपसचिव दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या परीक्षेत मास कॉपी, मैदानी चाचणी तसेच वैद्यकीय तपासणीत फेरफार करून विशिष्ट उमेदवारांना फायदा पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी आयोग आणि गृहविभागातील अधिकाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच MPSC मधील गैरप्रकार रोखण्यासाठी फक्त लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई करून भागणार नाही. यातील ‘मोठे मासे’ पकडणे गरजेचे असून, त्यासाठी अध्यक्षांनी राजीनामा दिलाच पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
परीक्षेतील गैरप्रकार आणि गोपनीयतेच्या उल्लंघनामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर आणि आंदोलनाच्या इशाऱ्यावर आता राज्य सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







