पुणे : उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून तब्बल ११ लाख २२ हजार ८०२ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून ‘अ’ वर्गाची फायनल समरी मंजुरीसाठी पाठवली आहे. चोरीचा मुद्देमाल किंवा संबंधित आरोपींचा शोध लागला नसल्याने हा गुन्हा कायमस्वरूपी तपासावर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सुहासिनी विजय जाधव या उरुळी कांचन परिसरात कुटुंबासह राहतात. त्या होमिओपॅथिक क्लिनिक चालवतात. १२ जून २०२६ रोजी रात्रीपासून २७ जून रोजी सकाळपर्यंतच्या कालावधीत घरातील कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला त्यांनी ४ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर दिलेल्या पुरवणी जबाबात आणखी दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ११ लाख २२ हजार ८०२ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान डॉक्टर महिलेने घरातील काही कुटुंबीय, नातेवाईक तसेच इमारतीतील काही भाडेकरूंविषयी संशय व्यक्त करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित आरोपी किंवा चोरीला गेलेला मुद्देमाल शोधण्यात पोलिसांना यश आले नाही.

गुन्ह्याच्या तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याचा आरोप करत महिलेने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याकडे लेखी निवेदने दिली होती. तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी तपास अधिकारी बदलावा किंवा गरज असल्यास स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवावा, अशीही मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, पोलिसांनी चौकशी व अन्वेषण केल्यानंतर तक्रार खरी असल्याचे आढळून आल्याचे कळवले आहे. मात्र, संबंधित आरोपी आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध लागला नसल्याने गुन्हा कायमस्वरूपी तपासावर ठेवण्यात आला आहे. तसेच गुन्ह्याची ‘अ’ वर्गात वर्गवारी करून फायनल समरी मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांच्या पत्रात नमूद आहे.







