मुंबई: आयसीसीने वनडे वर्ल्ड कप २०२७चे वेळापत्रक जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या तीन देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२७ रोजी वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून २१ नोव्हेंबर २०२७ रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा ग्रुप स्टेजमध्ये होणार आहे.

वनडे वर्ल्ड कप २०२७मध्ये एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. या संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. याशिवाय यजमान देश म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेला थेट प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरित चार संघांसाठी पात्रता फेरी खेळवली जाणार आहे.

ग्रुप एमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. या गटातील आणखी एक संघ पात्रता फेरीतून येणार आहे. ग्रुप बीमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यासोबत पात्रता फेरीतून येणारा एक संघ असेल.

भारतीय संघाच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. १४ ऑक्टोबरला भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध, १७ ऑक्टोबरला पात्रता फेरीतून येणाऱ्या संघाविरुद्ध, तर २४ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध सामना होणार आहे.
स्पर्धेतील सामने दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथील एकूण १२ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कपच्या तिकीटांसाठी नोंदणी आणि बॅलट प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रुप स्टेजनंतर सुपर-७ टप्पा होणार आहे. दोन्ही गटांमधील अव्वल तीन संघांसह चौथ्या स्थानावरील सर्वोत्तम संघाला या टप्प्यात प्रवेश मिळेल. सुपर-७मध्ये प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीतील विजेत्या दोन संघांमध्ये २१ नोव्हेंबरला वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.






