पुणे : पुणे-सोलापूर रोड उन्नत महामार्गाच्या मोजणीसंदर्भात हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राहुलदादा शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जमीन संपादन, मोजणी, मोबदला आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटिसांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सन २००४ किंवा त्यापूर्वी झालेल्या जमीन संपादन प्रक्रियेत काही ठिकाणी अनियमितता झाल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यापूर्वी संपादित करण्यात आलेल्या काही जमिनींचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचेही सांगण्यात आले. सन २००४ मध्ये संपादित झालेल्या जमिनीची हद्द आणि आता नव्याने होणाऱ्या संपादनाची हद्द कशी निश्चित केली जाणार, याबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.

नव्याने जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला किती आणि कोणत्या पद्धतीने दिला जाणार, यावरही बैठकीत चर्चा झाली. काही ठिकाणी यापूर्वी जमीन संपादन करताना सलगता न राखल्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक जमीन संपादित झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महामार्गासाठी आवश्यक तेवढीच जमीन संपादित करावी आणि जमिनीचा योग्य बाजारभाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय प्रकल्प अधिकारी विठ्ठल उदमले यांचीही शेतकरी प्रतिनिधींनी भेट घेतली. संबंधित शेतकऱ्यांना नव्याने नोटिसा देण्यात याव्यात, प्रत्येक सर्व्हे क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख नोटिशीत करावा आणि नोटीस संबंधित शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रत्येक गावात स्वतंत्र बैठक घेऊन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील मोजणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल, अशी ग्वाही दिल्याचे बैठकीत उपस्थितांनी सांगितले.
या बैठकीला माजी नगरसेवक शिवाजी भाऊ पवार, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे, संभाजी हाके, विजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, शेवाळेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, अमित गुंड, लोणीचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, निखिल काळभोर, निवृत्ती आंबेकर, नानासाहेब कुंजीर, विजय गायकवाड, शुभम तुपे, संतोष कांचन, प्रसाद भोर, संदीप कांचन, प्रशांत वाघ, गणेश आढाव, सम्राट चौधरी, विशाल चौधरी, संतोष देवकर, मनोज वाघ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.







