पुणे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.थेट रुग्णालयातून त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले जरांगे पाटील यांचे उपोषण आता पूर्णपणे स्थगित करण्यात आले असून, आंदोलनाचा पुढील टप्पा थेट मुंबईत रंगणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. तिथून पुढे मुंबईला जाऊन उपोषण करण्याचा त्यांचा विचार होता. प्रशासनाची परवानगी नसतानाही ते मुंबईत जाण्यावर ठाम होते. मात्र, सलग 18 दिवस चाललेल्या तीव्र उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली.

बीडमधील पाटोदा येथे दौरा पोहोचलेला असतानाच प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना हे उपोषण मागे घ्यावे लागले. त्यावेळी सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि मध्यस्थीनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले होते.शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला तरी, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. तसेच जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती. सरकारने या सर्व मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी मागितला आहे.

यावर जरांगे म्हणाले, “गेल्या 3 वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. सातत्याने केलेल्या उपोषणामुळे माझे शरीर आता उपोषणास साथ देत नाही. म्हणूनच आता मी रस्त्यावरील थेट लढाई लढणार आहे.” अंतरवाली सराटीतील स्थानिकांनी आणि तिथल्या ओबीसी बांधवांनी केलेल्या सहकार्याची आठवण ठेवत त्यांनी त्यांचे आभार मानले. आता अंतरवालीत कोणतेही आंदोलन होणार नसून, पाटोद्याहून मिळालेल्या 3 महिन्यांच्या मुदतीनंतर हा मोर्चा थेट मुंबईच्या दिशेने कूच करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.







