मुबंई : मुंबईतील राम मंदिर पूर्व भागात एका सार्वजनिक शौचालयाजवळ रसायनाचा उग्र वास पसरल्याने 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृणालताई पुलाजवळील पारसी पंचायत गेटसमोर ही धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शौचालयाच्या परिसरातून अचानक तीव्र आणि दुर्गंधीयुक्त रासायनिक वास येत होता. या विषारी वासामुळे तेथे गेलेल्या 2 जणांचा श्वास गुदमरला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. प्रभाकर धनिवार (वय 24) आणि भाविन देसाई (वय 18) अशी या मृत तरुणांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले . बीएमसी अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बाधित परिसर तातडीने रिकामा करून सुरक्षित करण्यात आला.

तब्बल 2 तरुणांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी पहाटे 3:49 वाजता तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

सार्वजनिक शौचालयाच्या जागेत हे घातक रसायन नक्की कुठून आले आणि मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा शोध सध्या पोलीस व संबंधित यंत्रणा घेत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.







