पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदेला कथित मारहाण व खंडणीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार विद्याधर गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाकडून दिव्या शिंदेला 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या ‘कलाविष्कार’ या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीवरून हा वाद सुरू झाला. तक्रारदार गायकवाड यांच्या दाव्यानुसार, त्यांनी या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे यांना कोणतेही निमंत्रण दिले नव्हते. तरीही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि आपण कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचे सांगत त्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली.

पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत दिव्या शिंदे यांनी आपल्या काही साथीदारांसह घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. घटनेच्या वेळी घरात एकटे असताना दिव्या शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान, छाती आणि डोक्यावर दुखापत केली, तसेच घरातील साहित्याची तोडफोड केली असा दावा तक्रारदाराने केला आहे.

या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दिव्या शिंदेला ताब्यात घेतले. न्यायालयासमोर हजर केले असता, पुढील तपासासाठी तिला पोलीस कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका, घरात झालेली तोडफोड आणि पैशांच्या मागणीमागचे सत्य शोधण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान हे सर्व आरोप सध्यातरी तक्रारदाराचे दावे असून न्यायालयीन प्रक्रियेतच तपासाचे निष्कर्ष स्पष्ट होतील.






