पुणे : दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. पुण्यातील कसबा पेठ, बिबवेवाडी आणि बावधन परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा अंदाजे १० टन संशयास्पद खवा आणि पनीर जप्त करण्यात आले आहे. कर्नाटकातून या पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या परिसरांत कारवाई करत खवा आणि पनीरची वाहतूक करणारी तीन ते चार वाहने जप्त केली. जप्त केलेल्या पदार्थांच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख, आवश्यक माहिती आणि अन्नसुरक्षेशी संबंधित तपशील छापलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

जप्त केलेला खवा आणि पनीर मानवी आरोग्यासाठी हानिकारक असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पदार्थांमध्ये भेसळ आहे का, तसेच ते सेवनासाठी सुरक्षित आहेत का, हे स्पष्ट होणार आहे.

दसरा आणि दिवाळीच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी संशयास्पद खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवले जात आहे. पुण्यातील या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.






