पुणे : कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी परिसरात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांकडून परिसरातील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वीही पोलिसांनी या भागात बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. साळवे गार्डनजवळील अल्टिमेट बिझनेस सेंटर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खातरजमा केली. खात्री झाल्यानंतर संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली.
याप्रकरणी २० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक २३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १४३ आणि ३(५), तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे करीत आहेत.
ही कारवाई परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक दीपक कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






