मुंबई :अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा कार्यभार सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासून हा विभाग राज्यभर चर्चेत आला आहे. अन्नातून होणाऱ्या विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी एफडीएने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घरगुती किंवा मंगल कार्यालयातील लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली असल्यास त्याची पूर्वकल्पना एफडीएला देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या नियमानुसार, लग्नसमारंभात जेवणाची व्यवस्था करताना आयोजकांना एफडीए विभागाला काही महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये एकूण किती पाहुणे जेवणार आहेत, जेवणाचा मेन्यू काय असणार आहे आणि जेवण तयार करण्याची जबाबदारी कोणत्या केटरर्सकडे आहे, याचा तपशील द्यावा लागेल.
मोठ्या समारंभांमध्ये अन्न दूषित होणे किंवा अन्न तयार करताना निष्काळजीपणा यामुळे विषबाधेच्या घटना घडू शकतात. अशा घटनांना प्रतिबंध घालणे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने ऑक्टोबर २०२६ मध्ये राज्यभरात तपासणी आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. या महिन्यात विभागाने एकूण १,९८६ तपासण्या केल्या आहेत.

औषध उत्पादन युनिट्सवर कारवाई : औषध उत्पादन युनिट्समध्ये २९२ तपासण्या करण्यात आल्या. या कारवाईत १७ परवाने रद्द करण्यात आले, तर ५५ परवाने निलंबित करण्यात आले.
औषध विक्रेत्यांची तपासणी : घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांच्या एकूण १,६९४ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १०५ परवाने रद्द, तर ३६७ परवाने निलंबित करण्यात आले.
बेकायदेशीर औषधांची जप्ती : एफडीएने कारवाईदरम्यान ३४.५१ लाख रुपयांची बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहेत.
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र’ या ब्रीदवाक्याला प्राधान्य देत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कठोर भूमिका घेण्यात येत असल्याचे एफडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लग्नसमारंभातील जेवणाच्या व्यवस्थेबाबतचा हा निर्णय अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.






