मुंबई : महाराष्ट्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सरळसेवा भरतीसाठी निर्धारित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) १ जानेवारी २०२६ पासून ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिरातींसाठी, ज्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा अद्याप पार पडलेला नाही, अशा पदभरतींसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्यात येणार आहे.
तसेच ५ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत MPSC मार्फत नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनाही ही सवलत लागू राहणार आहे.

या निर्णयाचा लाभ केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपुरता मर्यादित नसणार. MPSC व्यतिरिक्त इतर भरती परीक्षा आयोजित करणाऱ्या यंत्रणांमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांनाही वयोमर्यादेतील एक वर्षाची शिथिलता लागू राहणार आहे.

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे वयोमर्यादेमुळे सरकारी भरती प्रक्रियेपासून दूर राहण्याची भीती असलेल्या अनेक उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.






