मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारचा लक्ष एकल महिलांकडे असणार आहे. महाराष्ट्रातील एकल महिलांसाठी नवी योजना आणण्याच्या दृष्टीने सरकार तयारी करत असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यात १२ लाखांहून अधिक एकल महिला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेतला जाण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकल महिलांची आणि त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाटील यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे तीन लाख एकल महिलांची माहिती समोर आली आहे. आणखी महिलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत, त्यांच्या कुटुंबांना प्रस्तावित योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या योजनेचे स्वरूप, लाभाची रक्कम आणि अंमलबजावणीची तारीख याबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही.

दरम्यान, राज्य सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्याच्या चर्चेमुळे अशा महिलांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक महिला पतीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ, शिक्षण आणि घरखर्चाची जबाबदारी एकट्याने पार पाडतात. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी प्रस्तावित योजना महत्त्वाची ठरू शकते. तथापि, योजनेचा अंतिम निर्णय आणि लाभार्थ्यांसाठीचे निकष सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होतील.







