पुणे : दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवली. पुणे विभागात अवघ्या 2 दिवसांत केलेल्या या तपासणीत 20 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 3 आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या मोहिमेदरम्यान प्रशासनाने तब्बल 14,421 किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. या जप्त मालाची एकूण किंमत 49 लाख 39 हजार 951 रुपये असल्याची माहिती आहे. सणाच्या काळात कमी दर्जाचे किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ बाजारात विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही तपासणी करण्यात आली.
मिठाई आणि फराळ तयार करणारे कारखाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते तसेच खाद्यतेल विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, परवान्याशिवाय व्यवसाय आणि लेबलवरील माहितीमध्ये त्रुटी आढळल्या. काही पदार्थ आवश्यक गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचेही तपासणीत समोर आले.

शिक्रापूर येथील गणेश लाडूवाले, वानवडीतील पोर्णिमा स्टेटस आणि बिबवेवाडीतील सरवी स्वीट्स या आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधित ठिकाणी परवान्याशी संबंधित त्रुटी, अस्वच्छता आणि असुरक्षित अन्नसाठा आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले.

मोतीचूर लाडू, बुंदी, पेढा, बर्फी, चकली, मावा, पनीर, दही, दूध, खाद्यतेल, बेसन आणि ड्रायफ्रूटपासून तयार केलेल्या पदार्थांचाही तपासणीमध्ये समावेश होता. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधातही स्वतंत्र कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 86,447 रुपये किमतीचा साठा जप्त झाला. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित वाहन जप्त करण्यात आले असून आस्थापनाही सील करण्यात आली आहे.






