पुणे: भाऊबीजेचा सण बहिणीसोबत आनंदात साजरा करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला. बहिण आणि भाच्याला घरी घेऊन परतत असताना झालेल्या भीषण अपघातात भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ घाटात ही घटना घडली. विक्रांत गोपीनाथ मेहेर (वय 33, रा. वारूळवाडी, जुन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत मेहेर हे भाऊबीजेचा सण साजरा करण्यासाठी आपल्या बहिणीला आणि भाच्याला आणायला खेड येथे गेले होते. त्यानंतर ते तिघेही दुचाकीवरून वारूळवाडीकडे परतत होते. मात्र, पेठ घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, विक्रांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर असलेली त्यांची बहीण गायत्री सोनवणे आणि भाचा किरकोळ जखमी झाले.

नुकताच झाला होता विवाह

या अपघातामुळे मेहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विक्रांत यांचा काही काळापूर्वीच विवाह झाला होता. ते आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला घरी आणण्यासाठी गेलेला भाऊ पुन्हा कधीच परतणार नाही, या विचाराने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. वारूळवाडी परिसरातही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.






