पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा बघण्यासाठी मोठया संख्येने भाविक दाखल होत असतात. यंदाची अनंत चतुर्दशीला सुरू झालेली ही मिरवणूक दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत सुरूच होती. या 33 तासांच्या प्रदीर्घ प्रवासात पुण्याच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा मोठा उत्साह दिसून आला.एकीकडे इतर गणेश मंडळांच्या विसर्जनाला विलंब होत असताना, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने मात्र अवघ्या 4 तासांत आपली मिरवणूक पूर्ण करून आदर्श निर्माण केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मिरवणूक सायंकाळी 4:00 वाजता मंदिराच्या आवारातून निघाली. त्यानंतर या बाप्पाचे विसर्जन सायंकाळी 8:25 वाजेच्या सुमारास पार पडले. मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याचे नियोजन आधीपासूनच निश्चित करण्यात आले होते. विश्वस्तांपासून ते रथाच्या सारथ्यापर्यंत सर्वांमध्ये योग्य समन्वय होता आणि प्रत्येकाने दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडल्यामुळेच हे शक्य झाले.

दरम्यान, रस्त्यावरील प्रचंड गर्दी आणि साऊंड सिस्टीमच्या अतिवापरामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. न्यायालयाने आणि पोलिसांनी 4 बेस व 4 टॉप वापरण्याची मर्यादा आखून दिल्यानंतरही अनेक मंडळांनी डीजेचा मोठा आवाज चालू ठेवला. अलका टॉकीज चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असताना पोलीस केवळ शांतपणे पाहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. अहोरात्र चालणाऱ्या या गोंगाटामुळे शहरातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

पोलीस नियोजनावर टीका होत असताना, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या भूमिकेचे समर्थन केले. मिरवणूक किती वेळ चालली यापेक्षा नागरिकांची आणि भक्तांची सुरक्षितता ही पोलिसांसाठी अधिक महत्त्वाची होती, असे त्यांनी स्पष्ट केले. गर्दीच्या वेळी मंडळांना पुढे जाण्यासाठी जास्त घाई केली असती, तर चेंगराचेंगरीसारखी गंभीर घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना न घडता संपूर्ण सोहळा शांततेत पार पडणे हेच पोलिसांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.







