लोणी कंद, ता. 28 : स्टोन क्रेशरवर अल्पवयीन मुलाला कामावर ठेवून त्याला आवश्यक सुरक्षा साधने न दिल्याने क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद येथे घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी स्टोन क्रेशरच्या तीन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय-17) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप संभाजी शिळीमकर (वय -40 ), सत्यजित अशोक जना (वय -35) आणि अमित भगवान अकोलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार अजित हरीभाऊ कुर्हे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोणीकंद येथील साई राम स्टोन क्रेशर मशीन आरोपींनी ठेकेदारीवर चालविण्यास घेतली होती. प्रिन्स हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याला धोकादायक स्टोन क्रेशरवर कामाला ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याला हेल्मेट, सुरक्षा पट्टा, सुरक्षा जाळी यांसह आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, 12 सप्टेंबर रोजी प्रिन्स क्रेशर मशीनमध्ये अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर रविवारी (ता. 27) संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे करीत आहेत.






