मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 6 वर्षे उलटली असली, तरी या प्रकरणाशी संबंधित चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भावाच्या पोस्टमॉर्टेमबाबत काही नवीन दावे केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, पोस्टमॉर्टेम करणाऱ्या व्यक्तीकडून तिला अलीकडे काही माहिती मिळाली आहे.

श्वेताने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतच्या शरीरावर गंभीर दुखापती होत्या. त्याचा पाय मोडलेला होता, डोळ्यांना दुखापत झाली होती आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले. तसेच या घटनेत बंदुकीसारख्या उपकरणाचा वापर झाल्याचाही दावा तिने केला आहे. हे दावे सध्या श्वेताच्या वक्तव्यावर आधारित असून त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात झाला होता. सुरुवातीच्या पोस्टमॉर्टेम अहवालात मृत्यूचे कारण फाशीमुळे झालेला श्वासावरोध असे नमूद करण्यात आले होते. त्या अहवालात बाह्य दुखापती किंवा संघर्षाच्या खुणा आढळल्या नसल्याचेही सांगण्यात आले होते.

यानंतर AIIMSच्या वैद्यकीय मंडळानेही उपलब्ध वैद्यकीय कागदपत्रे आणि अहवालांचा अभ्यास करून मृत्यू फाशीमुळे झाल्याचे मत नोंदवले होते. शरीरावर फाशीशी संबंधित दुखापतीव्यतिरिक्त इतर दुखापती किंवा संघर्षाच्या खुणा नसल्याचे मंडळाने सांगितले होते.
दरम्यान, श्वेताने आपल्या व्हिडीओमध्ये या दाव्यांबरोबरच द्वेष आणि सूडाच्या भावनेत अडकण्याऐवजी प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. तिच्या या वक्तव्यामुळे सुशांतच्या मृत्यूबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.







