लोणी काळभोर, ता. १३ : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता. १२) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत, तर विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक समाधान सर्जेराव पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) मधील तरतुदीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आस्थापना मंडळाची बैठक १२ नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना मान्यता देण्यात आली. त्यानुसार सहा पोलीस निरीक्षकांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आला आहे.
या बदल्यांमध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष लक्ष्मण पांढरे यांची वाहतूक शाखेत, तर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांची बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज संभाजी हांडे यांची विशेष शाखेत, तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती भिवसेन खेडकर यांची लष्कर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याची जबाबदारी आता समाधान सर्जेराव पवार यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. प्रदीप पवार यांच्या बदलीनंतर पवार यांची नियुक्ती झाल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजात आता नव्या नेतृत्वाखाली कोणते बदल होतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संबंधित सर्व पोलीस निरीक्षकांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन कार्यभार स्वीकारावा आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.






