छत्रपती संभाजीनगर: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील निवासस्थानावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी त्यांच्या घराच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिन्ही तरुणांना ताब्यात घेतले. आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या तिघांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे मंत्र्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतरही वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी का पोहोचले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. तसेच एकही DCP किंवा ACP घटनास्थळी आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकाराबाबत संताप व्यक्त करताना शिरसाट यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. इतक्या गंभीर घटनेची तातडीने दखल घेणे अपेक्षित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला. महासंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, तिन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, हल्ल्यामागील कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






