पुणे : पुण्यातील धानोरी परिसरात सोमवारी सकाळी भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात मर्सिडीजच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता धानोरी रस्त्यावर हा अपघात झाला. सकाळच्या वेळी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना मर्सिडीज कार धानोरी रस्त्यावरून जात होती. त्याचवेळी अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली.

धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती चालकाने दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या अपघातामुळे धानोरी रस्त्यावरील वाहतूक काही काळ मंदावली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त कार बाजूला केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.






