राहुलकुमार अवचट

यवत: देवस्थान इनाम कृती समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यातील इनाम जमीन , मठ, मंदिर, देवस्थान, पुजारी, अर्चक, सेवाधारी , वर्ग ३ जमीन धारक यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी राज्य स्तरीय महा अधिवेशन दौंड तालुक्यातील बोरमलनाथ देवस्थान या ठिकाणी पार पडले. यावेळी व्यासपीठावर ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके, गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड .अण्णासाहेब शिंदे परशुराम हिंदू सेवा संघाचे विश्वजीत देशपांडे , दशनाम गिरी गोसावी समाजाचे ओमप्रकाश गिरी, मराठवाडा इनाम हक्क परिषदेचे ॲड. राजेंद्र बन , बोरमलनाथ देवस्थानचे आबा शेलार, नगरसेवक शीतल शिंदे, डॉ संजय सुपेकर यांच्यासह ब्राह्मण, गुरव, गिरी गोसावी, गोंधळी, घडशी, बैरागी, लिंगायत यांसह अशा सुमारे ११ समाजातील इनामधारक संघटनाचे नेते उपस्थित होते.

यावेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले गावागावातील छोट्या समाजातील देवाची सेवा करणाऱ्या घटकांना न्याय देणे अत्यंत आवश्यक आहे विविध शासकांनी दिलेल्या इनाम जमिनी हा त्यांचा अधिकार आहे व त्यांना तो मिळालाच पाहिजे त्यासाठी या समाजांसोबत मी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन दिले.

ॲड .अण्णासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सरकारने देवस्थान इनामधारक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे शासनाने जून महिन्यात तयार केलेल्या इनाम जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्यातून सरकारची भूमिका आम्हाला न्याय देण्याची दिसत नाही त्यामुळे हा संघर्ष तीव्र करून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणे आवश्यक असून यावेळी समाजाला आवाहन केल्यानंतर विविध समाजातील 50 च्या वर तरुणांनी आमरण उपोषणाला बसण्याची तयारी दाखवली.
1953 ला इनाम अबॉलीजमेंट कमिशन ने देवस्थान इनाम धारक शेतकऱ्यांवर प्रचंड मोठा अन्याय केला व तो आजतागायत दूर झालेला नाही संविधान शेतकऱ्यांच्या बाजूने आहे परंतु राज्यकर्त्यांना याचे गांभीर्य नाही हा लढा अधिक तीव्रतेने लढल्याशिवाय यश मिळणार नाही. शासनाने हीच भूमिका बदलली नाही तर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील ठेवावी लागेल असे विश्वजीत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
गावागावात संख्येने छोटा असलेल्या समाजावर बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेऊन इनामधारक शेतकऱ्यांना हुसकावून लावले जात आहे आमचे हक्क व अधिकारांसाठी या कृती समितीच्या माध्यमातून मोठा लढा उभारला जात आहे यश मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे ओमप्रकाश गिरी म्हणाले तर राजेंद्र बन यांनी शासनाला कायदा करताना आमचा विचार करावाच लागेल अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठी आंदोलन उपोषण होतील असा इशारा देत देव देश धर्माची सेवा करणाऱ्या या छोट्या समाज घटकांना न्याय दिलाच पाहिजे अशी मागणी केली.
यावेळी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्हिडिओ द्वारे संवाद साधत लवकरच हा प्रश्न घेऊन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील सुमारे १५ हजारच्यावर देवस्थान इनाम धारक शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. मेळाव्यासाठी अरविंद कुलकर्णी, गजानन जोशी, ऋषिकेश सुमंत, रंगनाथ गुरव सचिन रेणुकर, संतोष वाघमारे, श्रद्धा साखरे, भारत पुरी, सचिन गिरी, संजीव भारती, महंत दत्तात्रय गिरी महाराज,राज्य उपाध्यक्ष अवधूत गिरी, जगदेव गिरी, राज्य मीडियाप्रमुख रवी बन आदींनी परिश्रम घेतले.







