पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलीस अंमलदारांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर भागात असलेल्या पीएमपीएमलच्या बस डेपो परिसरामध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह अत्यंत संशयास्पद परिस्थितीत सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कोळी असे या मृत पोलीस अंमलदाराचे नाव असून ते शहर पोलीस दलात कार्यरत होते.
त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरगुती वाद किंवा कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी हे अतिशय टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येमागील मूळ आणि कनिष्ठ कारण काय होते, याचा अधिकृत उलगडा अद्याप झालेला नाही.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची सखोल पाहणी करून महत्त्वाचे पुरावे एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा सखोल तपास सध्या निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तपासाअंती हा मृतदेह बेपत्ता पोलीस कर्मचारी विजय कोळी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले . पोलीस कर्मचाऱ्याच्या या अचानक जाण्याने पिंपरी चिंचवड पोलीस वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.







